बीड दि.७(प्रतिनिधी):शेतकऱ्यांचे विद्युत पंप चोरणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवार (दि.६)रोजी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव शिवारातून विद्युत पंप चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.यामुळे शेतकऱ्यांमध्ये या चोरट्यांची एकप्रकारे दहशत निर्माण झाली आहे.या गुन्ह्याचा तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेने योगेश गोरख पोकळे, राजेश रंगनाथ तांबारे, सलिम बानूभाई शेख सर्व रा. तागडगाव, ता. शिरूर या चार जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच चोरी केलेल्या पाणबुडी मोटारी भरत रामभाऊ पवार रा. तागडगाव याला विकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न होऊन सदर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपाधीक्षक विश्वजित खुळे,पोनि शिवाजी बटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शेखर औटे,पोलीस हवालदार अशोक दुबाले,आनंद मस्के,सोमनाथ गायकवाड, बालासाहेब सानप,अश्विनकुमार सुरवसे व चालक सिद्धार्थ मांजरे यांनी केली आहे.

