मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला दोषसिद्ध आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने अंदुरे याला सत्र न्यायालयाने २०२४ मध्ये सुनावलेली जन्मठेपेची शिक्षाही यावेळी स्थगित केली. या सविस्तर आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही. अंदुरे याच्यावर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही खटला सुरू आहे; मात्र दोन्ही प्रकरणांत त्याला जामीन मिळाल्यामुळे अंदुरे आता तुरुंगातून बाहेर येऊ शकतो.डॉ.दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात प्रभातफेरीला गेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात होता, परंतु त्यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर २०१४ मध्ये प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. अंदुरे हा गोळ्या झाडणाऱ्यांपैकी एक होता, असा दावा सरकारी पक्षाने केला होता.त्यानंतर, १० मे २०२४ रोजी पुणेस्थित सत्र न्यायालयाने दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, कठोर अशा बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए) व शस्त्र कायद्यांतर्गत दाखल आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्याचवेळी, न्यायालयाने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती.अंदुरे याने दोषी ठरवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे आणि एका अंतरिम अर्जाद्वारे जामीन व जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने मंगळवारी त्याचा हा अर्ज मंजूर केला.

