Advertisement

बीड दि.३१ (प्रतिनिधी)-बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नियोजन समितीसह सर्व विकास कामे दर्जेदार झाली पाहिजेत असे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत विकास कामांचे तुकडे पाडायचे नाहीत अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.अशाच सूचना मागच्या काही बैठकांमधून दिवंगत अजित पवार यांनीही दिल्या होत्या. मात्र अशा सर्व सूचना असतानाही मागच्या काळात एसपी निवासस्थान दुरुस्तीसाठी एकाच परिसरातील कामे असतानाही तब्बल १३ वेगवेगळे कार्यारंभ आदेश देण्यात आले त्याचे काय ? या प्रकारावर कारवाई करून अजित पवारांच्या निर्देशांची प्रतिष्ठा प्रशासन राखणार का ? असा प्रश्न बीडकरांना पडला आहे.
   सार्वजनिक निधीतून विकास कामे करताना एका कामाचे वेगवेगळे तुकडे पाडायचे नाहीत,त्या संपूर्ण कामाची एकत्रित निविदा प्रसिद्ध करायची असे शासन निर्णय आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाची परिपत्रके आहेत.दिवंगत अजित पवार बीडचे पालकमंत्री असताना त्यांनी फार स्पष्ट शब्दात अशा सूचना देखील दिल्या होत्या.मात्र हे सारे असताना बीडमध्येच एसपींच्या निवासस्थान दुरुस्तीच्या कामांचे तब्बल १३ तुकडे दीड वर्षात पाडण्यात आले.एकाच परिसरातील इमारतीच्या दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या संस्थांना कामे देण्यात आली,असे तब्बल १३ कार्यारंभ आदेश देण्यात आले.म्हणजे अजित पवारांच्या शब्दाची काय प्रतिष्ठा आणि किंमत जिल्ह्यात ठेवण्यात आली ते वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.आता शुक्रवारी पुन्हा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी कोणत्याही परिस्थितीत कामांचे तुकडे पाडायचे नाहीत असे स्पष्ट निर्देश दिल्याचे सांगितले. सुनेत्रा पवारांची तळमळ आणि दर्जेदार कामांसाठीची धडपड यातून दिसत असली तरी जिथे अजित पवारांनी निर्देश दिलेले असताना आणि शासनाचे निर्णय असताना एसपी निवासस्थान दुरुस्तीसाठी सर्रास तुकडे पाडले गेले तेथेच कारवाई झाली नाही तर पालकमंत्र्यांच्या सध्याच्या निर्देशांना तरी कोण विचारणार ?

Advertisement

Advertisement