शिर्डी: जुन्या वादातून महिलेनेच महिलेवर चाकूने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डी येथे रविवारी (दि.१९) रात्री घडला.साई समाधी मंदिराजवळ असलेल्या दक्षिण बाजूच्या रस्त्यावर ही घटना घडली.जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर फिजा पटेल (वय २१) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
खून झालेली महिला जयश्री क्षीरसागर आणि अंजली खंडीझोड (वय २२) यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होते. हा खून करताना आरोपी फिजा पटेल हिने अंजली हिच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला होता, तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूदेखील अंजलीनेच उपलब्ध करून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली. साई समाधी मंदिराच्या भिंतीला लागून असलेल्या बाजारपेठेत फिजा पटेल हिने जयश्री क्षीरसागर यांच्यावर सपासप चाकूचे वार केले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला आणि हल्ला करणारी आरोपी महिला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. भाविकांची पळापळ झाली, तर दुकानदारही हादरले. ज्या ठिकाणी खून झाला, तेथून साई मंदिराची पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर आहे, तसेच साई संस्थानचे सुरक्षा रक्षकही या परिसरात तैनात असतात. मात्र, घटना घडली त्यावेळी घटनास्थळी कोणीही उपस्थित नसल्याचे दिसून आले.

बातमी शेअर करा
