परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी): शहरातील साठे नगर भागात एका इसमाचा विषारी हातभट्टी दारू पिल्याने मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आली असून नागरीक संतप्त होत दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
परळी शहरातील साठेनगर भागातील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. सुरेश मस्के चा सकाळी मृत्यु झाला. दारूच्या नशेत मृत्यु झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यु झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. यापूर्वी दोन वेळा दारूबंदी करण्याची मागणी घेऊन पोलीस ठाण्यासमोर उपोषण आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलीस थातूरमातूर कारवाई करतात त्यानंतर पुन्हा जशाला तसे हे धंदे सुरू होतात असा आरोप या नागरिकांनी केला आहे आमच्या कुटुंबाच्या उध्वस्तीकरणाला ही दारूच कारणीभूत असून साठे नगर भागातील दारूबंदी मुळापासून बंद करा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा साठेनगर भागातील नागरिकांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, नगरसेवक नितीन रोडे आदींसह या भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते. यावेळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी या नागरिकांना दारूबंदीचे आश्वासन दिले पोलीस तात्काळ या ठिकाणी कारवाई करून संपूर्ण दारूबंदी करतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बातमी शेअर करा
