मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला आहे. आज उर्वरित ११ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निकालांनी महायुतीचे वर्चस्व अधिक ठळक केले आहे. महायुतीने १० जागा जिंकल्या, तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गिते यांनी महायुतीला अनपेक्षित धक्का दिला. अनेक ठिकाणी महाविकास आघाडी (मविआ) च्या मतांचे मोठे विभाजन झाल्याचे स्पष्ट दिसले.
प्रमुख विजयी उमेदवार
नागपूर: भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा ५५२ मतांच्या फरकाने पराभव केला. पोतदार यांना ६८२ मते मिळाली, तर लोंढे यांना केवळ १३० मते मिळाली. येथे मविआची ९९ मते फुटल्याची चर्चा आहे.
धाराशिव-बीड-लातूर: भाजपचे बसवराज पाटील यांनी राज्यातील सर्वाधिक ७२१ मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांना ८४५ मते मिळाली, तर काँग्रेसचे महेश देशमुख यांना १२४ मते मिळाली.
सांगली-सातारा: भाजपचे धैर्यशील कदम यांनी मविआचे अभयसिंह जगताप यांचा ३०१ मतांनी पराभव केला. कदम यांना ५९३ मते मिळाली. पराभूत जगताप यांनी महायुतीची १०० मते फुटल्याचा दावा केला आहे.
जळगाव: महायुतीचे नंदकिशोर महाजन यांनी मविआचे शरद तायडे यांचा दारुण पराभव केला. महाजन यांना ५७७+ मते, तर तायडे यांना केवळ ५ मते मिळाली.
छत्रपती संभाजीनगर-जालना: भाजपचे सुहास शिरसाठ यांनी ४५५ मतांसह विजय मिळवला. मविआचे गणेश लोखंडे यांना १३५ मते मिळाली.
सोलापूर: भाजपचे राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख यांचा ३६५ मतांनी पराभव केला.
नांदेड: भाजपचे अमरनाथ राजूरकर यांनी तिसऱ्यांदा (हॅट्रिक) विजय मिळवला. त्यांना ३३९ मते मिळाली.
भंडारा-गोंदिया: भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी १४८ मतांनी विजय मिळवला.
परभणी-हिंगोली: शिवसेना (शिंदे गट) चे सईद खान यांनी विजय मिळवला. अल्पसंख्यांक चेहऱ्याला संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी संदेश दिल्याची प्रतिक्रिया खान यांनी दिली.
अमरावती: भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी एकतर्फी विजय मिळवला. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना शून्य मते मिळाली, ही काँग्रेससाठी मोठी मानहानी ठरली.
नाशिकमध्ये महायुतीला धक्का
नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार गिते यांनी महायुतीचे नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. गिते यांना ३५७ मते मिळाली, तर दराडे यांना २४८ मते मिळाली.
बिनविरोध विजेते (६ जागा)
पुणे: विक्रम काकडे (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
ठाणे: रवींद्र फाटक (शिवसेना - शिंदे गट)
कोकण: अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
यवतमाळ: दुष्यंत चतुर्वेदी (भाजप)
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर: अरुण लखाणी (भाजप)

