Advertisement

 परळी- गंगाखेड मार्गावर ट्रक पलटी

प्रजापत्र | Monday, 08/06/2026
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दि.८(प्रतिनिधी) : शहराच्या बाहेर पडतात शक्तीकुंज वसाहतीच्या काही अंतरावर राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या चार वर्षापासून पूलाचे रखडलेले काम सातत्याने डोकेदुखी ठरलेले आहे. वर्षानुवर्षे मागण्या करूनही राष्ट्रीय महामार्गाचा हा पूल आणि काही अंतरावरील रस्त्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे वारंवार या रस्त्यावर वाहतूक बंदीची वेळ येते. पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावर एक ट्रक पलटला आणि तब्बल दीड तास वाहतूक खोळंबल्याची घटना आज समोर आली. 
       परळी ते परभणी-धर्मापुरी मार्गावरील पुलाच्या कामाजवळ रविवार (दि.७)रोजी रात्री झाडे वाहून नेणारा एक ट्रक पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास  विस्कळीत झाली. ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सध्या या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता आधीच अरुंद झाला आहे. त्यातच ट्रक पलटी झाल्याने परळी-गंगाखेड,परळी-परभणी, परळी-धर्मापुरी, किनगाव तसेच नांदेडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली. अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. संबंधित उड्डाणपुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू असून त्याचा वेग अत्यंत मंद आहे. कामाची गती वाढवून प्रकल्प लवकर पूर्ण करावा, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. ट्रक अपघातानंतरही प्रवाशांमध्ये या कामाच्या संथ गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

Advertisement