Advertisement

 प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश

प्रजापत्र | Saturday, 30/05/2026
बातमी शेअर करा

मुबई : राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू असून आज महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

     गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ऐनवेळी दुसरा उमेदवार द्यावा लागला होता. एवढंच नाही तर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीमधून माघार घेतली होती.

दरम्यान, आज अखेर प्राजक्त तनपुरे यांनी मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्यासह आदी नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

Advertisement