Advertisement

 सेल्फीचा नाद जीवावर बेतला

प्रजापत्र | Sunday, 03/05/2026
बातमी शेअर करा

 पिंपरी: मावळ तालुक्यात दोन दिवसांत सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटना तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून, कामगार दिनी तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

     जाधववाडी येथे सेल्फी काढण्याच्या नादात तिघे मित्र बुडाले. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके (तिघेही रा. भोसरी) अशी त्यांची नावे आहेत. वलवण धरणात योगेश पालवे (वय ३०, रा. कुरवंडे, लोणावळा), यश कुलदीप धनोरिया (वय १३, रा. लोणावळा) यांचा मृत्यू झाला. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे पवन मावळातील साळुंब्रे गावच्या हद्दीत पवना नदी पात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके हे तीन मित्र भोसरी एमआयडीसीत एका खासगी कंपनीत कामाला होते. मूळचे परभणीचे असलेले हे तरुण अन्य मित्रांसोबत एक मे च्या कामगार दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून फिरायला गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास तिघांनीही धरणात उतरून पोहण्याचा निर्णय घेतला आणि पोहण्याचा आनंद लुटू लागले. पोहताना त्यांनी पाण्यात एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत सेल्फी काढू लागले. यावेळी सेल्फी काढणाऱ्याचा पाय निसटला आणि तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तेही खोल पाण्यात खेचले. त्या तीन मित्रांचा इतर मित्रांच्या डोळ्यादेखत धरणाच्या खोल पाण्यात बुडाले. त्यांच्या इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड केला. आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आपत्कालीन पथकाला तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

याच दिवशी साळुंब्रे गावच्या हद्दीत पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मनोज गौतम या तरुणाचाही बुडून मृत्यू झाला. तर, गुरुवारी (३० एप्रिल) लोणावळ्याजवळील कुरवंडे येथील योगेश पालवे आणि एका विद्यालयातील सातवीच्या वर्गात शिकणारा १३ वर्षीय विद्यार्थी यश धनोरिया हा हरविल्याची तक्रार दाखल केली होती. हा विद्यार्थी आपल्या दोन मित्रांसह फिरायला जात असल्याचे विद्यालयातील सीसीटीव्हीत दिसत होते. त्या अनुषंगाने यंत्रणेने त्याच्या मित्रांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ते विद्यालयापासून काही अंतरावर असलेल्या वलवण धरणाकडे फिरायला गेले असल्याचे समजले. मित्रांनी सांगूनही त्याने त्यांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करून पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पथकाने दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
 

Advertisement

Advertisement