सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा साठवण तलावात बुडून मृत्यु झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून खडकी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली अनिल घोडके (३५) या आपली मुले श्रेया अनिल घोडके (१२) आणि सोहम अनिल घोडके (१०) यांच्यासह गावातील साठवण तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पाय घसरल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकाला वाचवण्याच्या नादात तिघेही पाण्यात बुडाले असावेत, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोधकार्यादरम्यान आई वैशाली घोडके यांचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, श्रेया आणि सोहम या दोन्ही चिमुकल्यांचा शोध अद्याप सुरू असून, स्थानिक प्रशासन आणि शोधकार्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांवर काळाने झडप घातल्याने घोडके कुटुंबासह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

