मुंबई: राज्यातल्या एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्याची प्रक्रिया संथ झाल्याचे चित्र आहे. अद्याप १ कोटी ५ लाख वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवण्यात आलेली नाही. उर्वरित निम्म्या वाहनांनी अद्याप एचएसआरपीसाठी अपॉइंटमेंट घेतलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात एकूण २ कोटी १० लाख जुनी वाहने आहेत. त्यापैकी ९३ लाख वाहनांना एचएसआरपी बसवण्याचे काम सध्या पूर्ण झाले आहे. तर १२ लाख वाहन धारकांनी वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे. दरम्यान, अद्याप १ कोटी ५ लाख जुन्या वाहनांनी एचएचआरपीसाठी नोंदणीही केलेली नाही. कारवाईबाबत साशंकता आणि कालमर्यादेबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने वाहनधारकांनी देखील एचएसआरपीकडे पाठ फिरवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कंपनी नियुक्तीला मुदतवाढ
राज्यातील ६० प्रादेशिक-उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची तीन मंडळात विभागणी केली आहे. तीन मंडळांसाठी मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड, मेसर्स एफ टी ए एचएसआरपी सोल्युशन्स प्राईव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्यांची मुदत जानेवारी २०२६ मध्ये वाढवण्यात आली असून ती डिसेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

