Advertisement

नळदुर्ग-तुळजापूर महामार्गावर १० कोटींचे हॅश ऑईल जप्त

प्रजापत्र | Friday, 20/03/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.२०(प्रतिनिधी):  अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नळदुर्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नळदुर्ग-तुळजापूर महामार्गावर एका संशयित वाहनातून सुमारे १० कोटी रुपये किमतीचे हॅश ऑईल नावाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या छाप्या दरम्यान दोन संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून, पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

नळदुर्ग-तुळजापूर महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नळदुर्ग पोलिसांनी गुरुवारी रात्री महामार्गावर सापळा लावला होता. पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका संशयित वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वाहन वेगाने पुढे नेले.

 पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता, वाहनातील एक बॅग रस्त्यावर टाकून दोन आरोपींनी अंधारात पोबारा केला. पोलिसांनी संशयित बॅगेची झडती घेतली असता, त्यात अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. बाजारभावानुसार या अमली पदार्थांची किंमत साधारणतः १० कोटी ३२ लाख रुपयांच्या घरात असल्याचे तुळजापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले.

 जप्त करण्यात आलेला साठा नेमका कोणत्या प्रकारचा आहे, याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर धाराशिव पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा नाकाबंदी केल्या असून विशेष पथके आरोपींच्या मागावर आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कोठून आले आणि ते कुठे नेले जात होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत. हे अमली पदार्थ परराज्यातून महाराष्ट्रात आणले जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

 नेमके हॅश ऑईल आहे तरी काय?

गांजाच्या फुलांमधील आणि पानांवरील 'ट्रायकोम्स' नावाच्या चिकट ग्रंथींपासून हे तेल वेगळे केले जाते. यासाठी सहसा अल्कोहोल, ब्युटेन किंवा कार्बन डायऑक्साइड यांसारख्या द्रावकांचा वापर केला जातो. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एक जाड, मध किंवा मेणासारखा पदार्थ उरतो, ज्याला 'हॅश ऑईल' म्हणतात. साध्या गांजामध्ये नशेचे  प्रमाण साधारण १५% ते २५% असते. मात्र हॅश ऑईलमध्ये हेच प्रमाण ६०% ते ९०% पर्यंत असू शकते.
त्यामुळे याचा परिणाम मेंदूवर खूप जलद आणि तीव्र होतो.  भारतात हॅश ऑईल बाळगणे, विकणे किंवा त्याचे सेवन करणे हा गंभीर गुन्हा आहे
.

Advertisement

Advertisement