धाराशिव दि.२७(प्रतिनिधी ): आ.कैलास पाटील यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं की, आजकाल केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्डियाक कॅथलॅब नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये आरोग्य विभागाने कॅथलॅबसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. ऑक्टोबर २०२४ पर्यंत कॅथलॅब सुरू होणे अपेक्षित असताना अद्याप काम पूर्ण झालेले नाही. दहा बेडचे हॉस्पिटल आणि कार्डियाक कॅथलॅब मंजूर असूनही सुविधा सुरू न झाल्याने गंभीर रुग्णांना सोलापूर येथे हलवावे लागत आहे. मात्र ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आमदार पाटील यांनी सभागृहात सांगितले.
केवळ कमिशनरच्या सहीअभावी मशीन सुरू झालेली नाही - आ.कैलास पाटील
ट्रान्सफॉर्मर व जनरेटरच्या अडचणीमुळे काम रखडले
कॅथलॅबसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटरच्या निधीला स्थगिती मिळाल्याने काम अपूर्ण राहिल्याचे त्यांनी नमूद केले. 2025–26 मध्ये पुन्हा मंजुरी देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली. एमआरआय मशीन सुरू करण्यासही विलंब धाराशिवसाठी मंजूर असलेली एमआरआय मशीन सरकार बदलल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा घाट घालण्यात आला होता मात्र, धाराशिवकारांनी आंदोलन आणि त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने एम आर आय मशीन धाराशिव मध्ये ठेवण्यात आली. मात्र, एमआरआयचे काम पूर्ण झाले असूनही केवळ कमिशनरच्या सहीअभावी मशीन सुरू झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागत असून लोकांची हेळसांड होत असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना सांगितले.
५०० बेड सिव्हिल हॉस्पिटलचे कामही रखडले
धाराशिवमध्ये ५०० बेडचे सिव्हिल हॉस्पिटल मंजूर झाले असले तरी सुरुवातीला निधीची तरतूद नव्हती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक मार्फत निधी मंजूर झाला, मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असून काम तातडीने सुरू केल्यास मोठा दिलासा मिळेल, असे आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.

