छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिस भरती प्रक्रिया सुरु असून लोहमार्ग पोलिस भरतीची शारीरिक चाचणी सुरू असताना, धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला. संग्राम शिंदे (वय २३) रा. सांगली असे या तरुणाचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत लोहमार्ग पोलिस पदासाठी मैदानी चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातून आलेला संग्राम शिंदे हा तरुण १६०० मीटर धावण्याची चाचणी देत होता. चाचणी पूर्ण करत असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो मैदानावरच कोसळला.
संग्राम कोसळताच मैदानावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेतली. त्याला रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.भरतीसाठी आलेल्या एका उमद्या तरुणाचा असा अचानक मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्युचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.

बातमी शेअर करा
