Advertisement

महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद

प्रजापत्र | Sunday, 08/02/2026
बातमी शेअर करा

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद राहणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, सध्या मंदिर परिसरात डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

     दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भीमाशंकर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि सुरू असलेल्या दुरुस्ती कामात अडथळा येऊ नये यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर भाविकांनी मंदिरात येण्याचे टाळावे व या निर्णयाची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने भाविकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असून, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित दर्शन सुरू होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Advertisement

Advertisement