परभणी : सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने बऱ्याच ग्रामीण भागात आणि गावोगावी कीर्तन सोहळे साजरे होत आहेत. रात्री उशिरापर्यंत गावागावात कीर्तनाचे सोहळे संपन्न होत आहेत. असाच सोहळा परभणी तालुक्यातील पिंपळा या गावामध्ये चालू होता. या कीर्तन सोहळ्यासाठी परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील तिघेजण पिंपळा या गावी आले होते.
रात्री उशिरापर्यंत कीर्तनाचा आस्वाद घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे दुचाकीवर निघाले. परभणी-जिंतूर रोडवरून जाताना परभणीच्या झरी गावाजवळ लोअर दुधना कालव्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अन् कारचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात तीनही वारकऱ्यांचा मृत्यु झाला. मृत पावलेल्या वारकऱ्यांमध्ये माऊली दिगंबरराव कदम (वय ३०), प्रसाद राव कदम (वय ४५),दोघेही राहणार बोर्डिंग तालुका जिंतूर आणि दत्ता माणिकराव कराळे (वय ३०, रा. मुळा तालुका जिंतूर) अशी मयतांची नावे आहेत. तिघंही वारकऱ्यांचा करुण अंत झाल्यानं वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

