Advertisement

देशमुख हत्या प्रकरणात न्या.ताहलियानी समितीचा पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांवर ठपका ?

प्रजापत्र | Saturday, 10/01/2026
बातमी शेअर करा

 बीड दि. ९ (प्रतिनिधी ): केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्या. एम एल ताहलियानी समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात समितीने या प्रकरणाला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सविस्तर तपशील दिला असल्याची माहिती आहे. त्यासोबतच समितीने काही अल्पकालीन व दीर्घकालीन शिफारसही सुचविल्या आहेत. आता या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक समिती नेमली आहे.

       केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ माजली होती. त्यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने सीआयडीच्या विशेष तपास पथकासोबतच एक वेगळी स्वतंत्र समिती न्यायालयीन चौकशीसाठी नेमली होती. निवृत्त न्या. एम एल ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीला घटनेची पार्शवभूमी, त्या अगोदरच घटनाक्रम, अशा घटना घडण्याची कारणे, या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्ती आदींबाबत चौकशी करून अहवाल देण्यास तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी शिफारशी करण्यास सांगण्यात आले होते.
या समितीने सहा महिन्यात आपला अहवाल देणे अपेक्षित होते, मात्र चौकशीची व्याप्ती वाढत असल्याचे सांगत समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. आता अखेर मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्येच समितीने आपला अहवाल राज्य सरकारला दिल्याचे  स्पष्ट झाले आहे. या अहवालात समितीने या घटनेस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सविस्तर तपशील दिलेला आहे. त्यासोबतच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गृह विभागाला पोलीस अधिकारी,कर्मचारी नियुक्तीच्या संदर्भाने काही शिफारशी केल्या आहेत. आता या शिफारशींचा अभ्यास करून कार्यवाहीचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक समिती नेमली आहे. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या समितीत प्रधान सचिव, अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) गृह विभागाचे सहसचिव व्यकटेश भट,गृह विभागाच्या विधी शाखेचे उपसचिव हे सदस्य असून गृह विभागाचे उपसचिव हे सदस्य सचिव असणार आहेत.या समितीने या घटनेच्या अनुषंगाने राजकीय सामाजिक परिस्थितीची देखील चौकशी केली आहे. त्यामुळे आता या समितीच्या अहवालावर शासन काय कारवाई करते आणि हा अहवाल कधी सार्वजनिक करते हे नव्या समितीच्या शिफारशींवर अवलंबून असेल.
 
 

पोलिसांवर होते गंभीर आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा कंपनीत झालेल्या मारहाणीची सुरुवातीच्या काळात तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे तसेच संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर त्याच्या तपासात देखील दिरंगाई केल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर केज पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात कारवाई झाली होती, मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षकावर केवळ आरोपांवरून  कारवाईस शासनाने नकार दिला होता. आता न्यायालयीन समितीच्या अहवालात नेमकी कोणकोणत्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

Advertisement

Advertisement