मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण शांत होत नाही तोवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. या संस्थेच्या जागा भाड्याने देण्यास धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली होती, मात्र या संस्थेच्या विश्वस्तांनी ती जागा विकली असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
विजय कुंभार म्हणाले, “काही दिवसापूर्वी अजित पवारांची पत्रकार परिषद ज्या जागेवर झाली त्यासंदर्भातील आजचा विषय आहे. महारेराच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार या प्रकल्पाबाबतीत कोणताही करार करण्यास बंदी करण्यात आली आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची जागा शिवाजीनगरला आहे. ती जागा विकसित करण्याकरता कल्पवृक्ष प्लॅन्टेशन नावाच्या कंपनीने हा प्रकल्प घेतला. कोणत्याही संस्थेची जागा द्यायची झाली तर धर्मादाय आयुक्ताची परवानगी लागते. तशी परवानगी घेण्यात आली. परंतु, ती परवानगी साठ वर्षांकरता लीजसाठी देण्यात आली होती. त्यासाठी टेंडर काढण्याचं भासवण्यात आलं. परंतु, या कंपनीने ही जागा विकलेली आहे. त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे. ती जागा आणि व्यवहार संशयास्पद आहे.”
“सर्व शासकीय तरतुंदीचा भंग करून, महारेराची ऑर्डर असतानाही राष्ट्रवादीसाठी ही जागा विकली गेली आहे. धक्कादायक म्हणजे, भाजपादेखील यात सहभागी आहेत. ते सत्तेत असल्याने अजित पवारांवर कारवाई करत नाहीत. म्हणूनच अजित पवारांना अडचणीत आणण्याचं भाजपाकडून सातत्याने म्हटलं जातंय”, असंही विजय कुंभार म्हणाले.

