पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ५ जणांच्या टोळक्याने २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून आणि दगड घालून त्याचा निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. तौकीर शेख (वय २२, रा. धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून झालेला तौकीर शेख याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मिनाक्षीपुरम येथील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये तौकीर शेख हा बसलेला असताना, दुपारी अडीचच्या सुमारास ५ हल्लेखोर तिथे आले. या हल्लेखोरांनी अचानक तौकीरवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या तौकीरवर त्यांनी त्यानंतर दगड घालून अत्यंत क्रूरपणे त्याचा खून केला. घटना घडल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या ५ हल्लेखोरांपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सिंहगड रस्ता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वैयक्तिक वैमनस्य, टोळीयुद्ध किंवा अन्य काही कारण आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू असून, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

