पुणे : कात्रजचा नवा बोगदा (जांभूळवाडी) ते नवले उड्डाणपूल या दरम्यानचे अपघात कमी करण्यासाठी तातडीच्या, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील वेगमर्यादा ६० वरुन ३० किमी प्रतितास करणार, अशी घोषणा केंद्रीय हवाई उड्डाण वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली. तर आरटीओच्या माध्यमातून लोड चेकिंगही केले जाणार आहे. अवजड माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी वेगमर्यादेचं उल्लंघन केलं, तर त्यांना तात्काळ दंड ठोठावण्याची व्यवस्था करण्याचा मोठा निर्णयही मोहोळांनी जाहीर केला.
मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
त्यानंतर केंद्रीय हवाई उड्डाण वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही नवले पुलाजवळील वाढत्या अपघातांचा आज आढावा घेतला. पत्रकारांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, या भागात पीएमपीएल बसच्या दिवसात ३९५ फेऱ्या होतात. तिथे अधिकृत बसथांबा नसल्यामुळे रस्त्यावर लोक थांबून गर्दी होते. त्यामुळे बस स्टॉप बांधावा लागेल.
अवजड वाहनांबाबत मोठा निर्णय
मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, खेड शिवापूर टोलनाक्यावर अवजड वाहनांचा लोड चेक केला जाईल. तो जास्त असेल तर दंडही आकारला जाईल आणि जागेवरच लोड कमी करण्याची व्यवस्था केली जाईल. सहा स्पीडगन लावल्या जातील. अवजड माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी वेगमर्यादेचं उल्लंघन केलं, तर घरी चालान पाठवलं जाईलच, मात्र पुढच्या टोलनाक्यावर तातडीने अडवून दंड केला जाईल, अशी व्यवस्था करावी लागेल.
महापालिका आयुक्तांच्या बैठकीत काय ठरल्या उपाययोजना?
याधी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी महापालिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय), वाहतूक पोलिस, परिवहन विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आदी विभागांतील अधिकाऱ्यांची काल एकत्रित बैठक घेतली. यामध्ये तातडीच्या, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली असून, ही कामे किती काळात करावी, याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवले पुलाजवळील रस्त्यादरम्यान चेक पोस्ट उभारणे, सूचना फलक, ‘स्पीडगन’द्वारे कारवाई, ‘रम्ब्लर पेंट’ मारणे, ‘सर्व्हिस लेन’ विकसित करणे, भुयारी मार्ग बांधणे; तसेच जांभूळवाडी ते सुतारवाडी-पाषाण या दरम्यान सहा लेनचा उन्नत मार्ग बांधणे, या उपाययोजनांचा समावेश आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, ‘एनएचआय’चे संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, ‘पीएमआरडीए’चे प्रभाकर वसईकर, प्रांताधिकारी यशवंत माने आदी कालच्या बैठकीला उपस्थित होते. या रस्त्यावर चेकपोस्ट उभारून त्याला अटकाव करणे, संशयित वाहनचालकांची तपासणी करणे, वाहनांचा वेग मर्यादित राहावा यासाठी ५००, ३०० आणि १०० मीटर अंतरावर ‘रम्ब्लर पेंट’ मारण्यात येणार आहे.

