Advertisement

 लाडक्या बाप्पाला निरोप देताना चार जणांचा बुडून मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 07/09/2025
बातमी शेअर करा

पुणे दि.७ (प्रतिनिधी) : राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याने उत्सवाला शोककळा लागली आहे. पुणे जिल्ह्यात विसर्जनावेळी चार जणांचा मृत्यु झाला. नांदेडमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या तिघांपैकी दोन जण पाण्यात वाहून गेले.मुंबईच्या साकीनाका परिसरातही मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना घडली. विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यु झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारे पुणे, नांदेड आणि मुंबईतील अपघातांमुळे गणपती विसर्जनाचा आनंद दुर्दैवी वळणावर गेला असून वातावरणात शोककळा पसरली आहे. चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे.  

चाकण परिसरात चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यु 
यामध्ये वाकी खुर्द येथील भामा नदीत दोन जण  बिरदवडी येथील विहिरीत एक जण, शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण  अशा वेगवेगळ्या घटनात चार जण बुडाल्याची दुदैवी घटना घडली असुन वाकी खुर्द येथे भामा नदीत एक वीस वर्षाचा कोयाळीचा विद्यार्थी तसेच १९ वर्षाचा उत्तर प्रदेशातील तरुण आहे. शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत ४५ वर्षाचा पुरुष बुडालेला आहे. बिरदवडी येथील विहिरीतही एक तरुण बुडालेला आहे.भामा नदीतील बुडालेल्या तरुणांना रेस्क्यू पथकाने शोध मोहीम घेऊन काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे.

 

विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू, तर चार गंभीर जखमी
साकीनाका परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून शॉक बसला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. SJ स्टुडिओसमोर खैराणी रोडवर हाय टेन्शन वायरमधून एक छोटी वायर खाली लटकत होती. ही वायर थेट विसर्जन ट्रॉलीला लागल्याने पाच जणांना विद्युत धक्का बसला.

 

एकाचा मृत्यु, चार गंभीर जखमी
जखमींमध्ये बिनू शिवकुमार (वय ३६ ) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (१८), धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०) आणि करण कानोजिया (१४) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

नांदेडमध्ये दोघे बेपत्ता
 नांदेड लगतच्या गाडेगांव इथले तीन युवक विसर्जनासाठी आसना नदीवर गेल्याने तोल जाऊन नदीत बुडाले, त्यापैकी एक जण बचावला असून दोघं अद्याप बेपत्ता आहेत. या दोन्ही युवकांचा एसडीआरएफच्या पथकाकडून काल संध्याकाळ पासून शोध घेण्यात येतोय, मात्र अद्याप युवकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे गाडेगांव ग्रामस्थ चिंतेत बुडाले आहे.

Advertisement

Advertisement