मुंबई : मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलनाचा वाद आता न्यायालयात पोहोचला असून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांने कोर्टात केला आहे. आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात (High court) बाजू मांडण्यात आली असून कैलास खांडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे परवानगी मिळणार की नाही हे पाहावे लागेल. दरम्यान, हायकोर्टाने काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले असून मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे, आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका, असे निर्देशच न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
मुंबईत संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत, त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आलं. तसेच, मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत, त्यांना कसं अडवणार अशी विचारणाही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. न्यायालयाने आजच्या सुनावणी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं. दरम्यान, सुनावणीदरम्यान हायकोर्टाच्या बाहेर मराठा आंदोलक अनेक ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळालं.
एमी फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाच उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांकडून कोर्टाला सांगण्यात आलं. मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांने कोर्टात केला आहे. तर, आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकांत अडाते हेही उच्च न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली असून कैलास खांडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे.