मुंबई : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (manoj jarange) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्या शिवाय मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांना या आधी आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांना अटी-शर्ती पाळणारे हमीपत्र देण्यात आल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज पाहाटे जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईत धडकला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जरांगे आझाद मैदानावर पोहचले. उपोषणाला सुरूवात करण्यापूर्वी त्यांनी मराठा आंदोलकांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, "आधी सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं, आपलं ऐकत नव्हतं, म्हणून मुंबईत आलो आहे. पण आता सरकारने सहकार्य केले आहे, परवानगी दिली आहे. आमरण उपोषण १० वाजल्यापासून सुरू झालं आहे, असे (manoj jarange) जरांगे यांनी सांगितले. गडबड गोंधळ करू नका, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी येथे आलो आहे. एकजुटीचा फायदा घेऊन आपला समाज मोठा होईल याचा विचार करा," असे आवाहन जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केले.
'आता मुंबई सोडणार नाही'
सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. सरकारने आता गोळ्या घातल्या तरी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागे हटणार नाही. मराठा समाजासाठी मरण पत्करायला तयार आहे पण, हटणार नाही, असे जरांगे म्हणाले.
मराठ्यांची मन जिंकण्याची संधी; जरांगेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
जरांगे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा. मराठ्यांच मन जिंकण्याची संधी आहे. समाजाच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आहे. आता तुम्ही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, याच ठिकाणी उपोषण करून मृत्यू पत्करेन, असे आवाहन जरांगे यांनी सरकारला केले आहे.