जळगाव : पाचोऱ्यातील एका गावातील (Crime) दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थीनी दररोज शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे स्कूल बसने ये-जा करत होती. गेल्या महिन्यात बस चालक अबिद हुसेन शेख जलील (३८, रा. शेंदुर्णी) याने मुलीचा गावातच पाठलाग करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने माळेगाव (ता. जामनेर) येथील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडितेने घरी सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी मंगळवार (दि.१९) रोजी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.विद्यार्थीनीच्या तक्रारीनुसार, आरोपी वारंवार फोन करून तिला धमकावत होता आणि अश्लील बोलून त्रास देत होता. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गावातून दररोज ५० ते ६० विद्यार्थी–विद्यार्थिनी शेंदुर्णी येथे स्कूल बसने ये-जा करत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन बस चालकाने यापूर्वी देखील काही विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले आहे का, याची तपासणी पोलीस करीत आहेत.