अहिल्यानगर: नेवासा फाटा येथील फर्निचर गोदामाला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. आगीमधून एकजण बचावला, तो जखमी आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयूर अरुण रासने (वय ३६), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (वय ३०), दोन मुले अंश मयूर रासने (वय १०) व चैतन्य मयूर रासने (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) अशी मृतांची नावे आहेत तर या घटनेत यश किरण रासने (वय २५) जखमी असल्याची माहिती नेवासा पोलिसांकडून मिळाली. जखमी यश रासने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पाचही जणांचा भाजून व गुदमरून मृत्यु झाला असावा, असा प्राथमिक अंदाज नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर आतमध्ये ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात ही घटना घडली.या भागातील अहिल्यानगर वसाहतीत रासने यांचे कालिका फर्निचर हे दुकान आहे. खाली दुकान, वरच्या मजल्यावर रासने कुटुंबीय राहतात तर पाठीमागे फर्निचरचे गोदाम आहे. या गोदामाला मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. तेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते.आग लागली तेव्हा रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मात्र लाकडी फर्निचर, भुसा व फोम यामुळे आगीचा लगेच भडका उडाला व आग पसरली. झोपेत असल्यामुळे रासने कुटुंबीयांना आग लागल्याचे समजलेच नाही. परिसरातील नागरिकांना आगीची माहिती मिळेपर्यंत उशीर झालेला होता. रासने कुटुंबातील अरुण रासने व त्यांच्या पत्नी मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते, त्यामुळे ते बचावले.आगीची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. नेवासा पंचायत समितीचे अग्निशमन दल, भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखान्याचे अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. पहाटेपर्यंत आग धुमसत होती. सकाळी आग वीझली गेली. या घटनेने नेवासा परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. दोन दिवसांपूर्वीच राहता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील विहिरीत पाच जणांचे मृतदेह आढळले होते. वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने जिल्हा हादरला होता. त्यानंतर आता नेवासा येथील एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती आगीमध्ये मृत्युमुखी पडल्या.