Advertisement

अतिवृष्टीग्रस्त वाशी तालुक्याला कृषी मंत्री दत्तात्रेय भरणेंची भेट

प्रजापत्र | Saturday, 16/08/2025
बातमी शेअर करा

धाराशिव (दि.१६): वाशी तालुक्यात १४ व १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ९१ मिलिमीटर धुवाधार पावसामुळे घोडकी व परिसरात डांबरी रस्ता वाहून गेला असून उस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शनिवारी (दि.16) घोडकी गावाला भेट दिली.

तुकाराम देशमुख या शेतकऱ्याचे तब्बल दोन एकर सोयाबीन पाण्यात साचल्याने पूर्णपणे नष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भरणे म्हणाले, “सोयाबीन लागवड धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाली असून अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पंचनामे करून अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत दिली जाईल.”

पत्रकारांनी विचारलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. “मी स्वतः शेतकरी आहे, मला देखील कर्जमाफी हवीच. मात्र याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील,” एवढ्यावरच ते थांबले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अपेक्षाभंग व निराशा पसरली.

दरम्यान, कळंब तालुक्यातील खोंदला येथे एका शेतकऱ्याचा पुरात बळी गेला असून त्या कुटुंबाला भेटण्यासाठी ते पुढे जाणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

या पाहणीवेळी वाशी तालुका तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी बर्वे, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच पंचकोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement