लातूर: रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील(Crime) एकाने पिंपळफाटा येथे खुल्या प्लॉटमध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, मयत व्यक्तीच्या आईचाही मृतदेह गावातील शेतात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. पोलिस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सांगवी येथील काकासाहेब विनोद जाधव (वय ४८) यांनी रेणापूर पिंपळफाटा येथील शिवनेरी धाब्याच्या पाठीमागे, गावाकडे जाणाऱ्या पाठीमागच्या रस्त्याच्या बाजूस असलेल्या प्लॉटधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती मयताचा मेहुणा विनायक कोंडीराम जगदाळे (रा. ईटी, ता. रेणापूर) यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्पॉट पंचनामा करून मृतदेहास खाली काढले. त्यानंतर काकासाहेब वेणुनाथ जाधव यांचा मृतदेह रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात नोंद करून तपास विपीन मामडगे यांच्याकडे देण्यात आला. दरम्यान, सांगवी येथे जाधव यांच्या शेतात आई समंदर वेणुनाथ जाधव (७०) यांचा मृतदेह पोत्यात बांधून खड्ड्यात पुरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे आता पोलिसही चक्रावले आहेत.