Advertisement

नितीन गडकरींचे घर उडवून देण्याची धमकी

प्रजापत्र | Sunday, 03/08/2025
बातमी शेअर करा

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूरमधील निवासस्थानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात ही धमकी मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीकडून आली असण्याची शक्यता समोर आली असून, पोलिसांनी संशयित उमेश राऊत याला ताब्यात घेतले आहे.

   शनिवारी रात्री नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमवर आलेल्या एका कॉलमध्ये नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या कॉलनंतर नागपूर पोलिसांची तातडीने हालचाल सुरू झाली. महाल आणि वर्धा रोडवरील गडकरी यांच्या दोन्ही निवासस्थानांची कसून झडती घेण्यात आली, मात्र कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.पोलिसांनी कॉलचा स्रोत शोधताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे कॉल कोतवाली हद्दीतील एका भाड्याच्या घरातून आल्याचं निष्पन्न केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उमेश राऊत या व्यक्तीस ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले की, फोन त्याच्याकडे असला तरी कॉल त्याच्या मित्राने केल्याचा दावा केला. विशेष म्हणजे हे दोघेही नागपूरच्या मेडिकल चौकात असलेल्या एका देशी दारूच्या भट्टीवर काम करतात.

उमेश राऊतच्या या दाव्याची पोलिस सखोल चौकशी करत आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार, कोणताही दहशतवादी हेतू यामागे नसल्याची शक्यता आहे. तरीही पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा कोणतीही जोखीम न पत्करता संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहेत. गडकरी यांच्या घराच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वीही २०२३ मध्ये बेळगाव कारागृहातील कैदी जयेश पुजारीने नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकी दिली होती. त्या प्रकरणातही राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सहभागी झाली होती. त्यामुळे या नव्या प्रकरणाकडेही यंत्रणा अत्यंत गंभीरतेने पाहत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा एकदा नागपूर पोलिसांच्या अलर्ट प्रणालीची परीक्षा झाली असून, तातडीच्या प्रतिसादामुळे कोणताही अनर्थ टळला आहे. संशयितांचा हेतू केवळ नशेतून केलेला प्रकार होता की काही दुसरं, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.

Advertisement

Advertisement