पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या(Pune) त्रासाला आणि छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच परंतु वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग अशी नवऱ्याची मागणी होती, तर तू पांढऱ्या पायाची आहेत असं म्हणत सासू (Crime)मानसिक छळ करत होती. या सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने विषप्राशन केले. ही धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे.
तु माहेरावरुन काय आणले आहेस
सुनेने झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी २३ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती अजय यांच्याशी २२ मे २०२२ मध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर अजय पवार यांनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर फिर्यादी यांची सासू कमल पवारने फिर्यादी यांना "तु माहेरावरुन काय आणले आहेस तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही" असं म्हणत मानसिक त्रास दिला.
मी तुझ्याशी टाईमपास केला, आता तू मेली तरी
पती अजय पवार यांनी सुद्धा फिर्यादी यांना "मी तुझ्याशी टाईमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे मला चारचाकी गाडी घेवून देण्यास सांग तुझ्या बापाला," असं म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. असं म्हणताच पतीने पत्नीचा गळा दाबून त्यांना पुन्हा मारहाण केली. फिर्यादी यांचे दीर मनोज पवार यांनी सुद्धा त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. २१ मे रोजी फिर्यादी यांची सासू यांनी, "पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढीन," अशी धमकी दिली. तसेच "तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही. तु घरात आल्यापासून शांतता नाही," असं हिणवलं. हा त्रास सहन न झाल्याने फिर्यादी यांनी रागाच्या भरात झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. फिर्यादी यांची तब्येत आता बरी असून त्यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.