मुंबई : पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे केलेल्या ड्रोन हल्ल्यात घाटकोपरमधील जवान मुरली नाईक (२३) यांना वीरमरण आले. गेल्या काही दिवसांपासून ते जम्मू परिसरात कर्तव्य बजावत होते. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासूनच भारताच्या विविध सीमावर्ती भागामध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. या हल्ल्यात काही भारतीय नागरिक आणि लष्कराच्या जवानांना वीरमरण आले.
घाटकोपरमधील कामराज नगर येथे वास्तव्याला असलेले जवान मुरली नाईक गेल्या काही दिवसांपासून जम्मू परिसरातील उरी येथे कर्तव्यावर होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या एका ड्रोन हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.मुरली नाईक २०२२ मध्ये लष्करात भरती झाले होते. ते मूळचे आंध्र प्रदेशमधील रहिवासी असून सध्या त्यांचे कुटुंबीय आंध्र प्रदेशमधील कफीदांडा या गावी राहत आहेत. मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच घाटकोपर परिसरात शोककळा पसरली.