Advertisement

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली बैठक

प्रजापत्र | Tuesday, 24/11/2026
बातमी शेअर करा

धाराशिव  : जिल्ह्यातील गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये धाराशिवची पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. मागील महिन्यात सुमारे ८ टक्के असलेला पाणीसाठा एका महिन्यात घसरून ५.३४ टक्क्यांवर आला आहे. ही बाब लक्षात घेता आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मंत्रिमंडळाच्या उप समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य या नात्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील अत्यल्प पाणीसाठ्याची वस्तुस्थिती मांडत जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने उद्याच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.धाराशिव जिल्ह्याला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. पावसाचे अनिश्चित प्रमाण, भूजल पातळीत होणारी घट आणि मर्यादित जलसाठा यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन संभाव्य संकटाचा आधीच वेध घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.या बैठकीत जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचा सविस्तर आढावा घेणे, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, पर्यायी जलस्रोतांचा वापर करणे तसेच आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे यावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून पाणीटंचाई निवारणासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ सचिव, धाराशिवचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागांचे अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.धाराशिव जिल्ह्यातील कोणत्याही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, हा या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन, विभागीय समन्वय आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनाच्या माध्यमातून संभाव्य संकटावर वेळीच मात करण्याचा निर्धार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

Advertisement

Advertisement