बीड दि. २२ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यात जलजीवन योजना अगदी सुरुवातीपासून वादात अडकलेली असून या योजनेत ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणावर बोगसगिरी झाल्याचे सातत्याने बोलले जात होतेच.आता जिल्ह्यातील भीषण दुष्काळाने या योजनेचा भ्रष्ट चेहरा उघडा पडला आहे.जिल्ह्यात ज्या गावांमध्ये जलजीवनमधून कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत,अशा अनेक गावांची तहान आता टँकरद्वारे भागवावी लागत आहे.त्यामुळे जलजीवनसारख्या योजनांवर झालेला खर्च कोणाच्या उपयोगी पडला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यात जलजीवन अभियान मागच्या काही वर्षांपासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून वादग्रस्त ठरले.अधिकाऱ्यांच्या नातलगांना कामे देण्याचा विषय असेल किंवा योजनेच्या मधल्या टप्प्यावर आराखड्याची रक्कम वाढविण्याचे विषय असतील,या योजनेत मोठ्याप्रमाणावर खाबूगिरी होत असल्याचे वारंवार समोर आले.अनेक गावांबद्दल प्रशासनाकडे तक्रारी झाल्या,मात्र जलजीवनमधील खाबुगिरी ज्या यंत्रणेच्या आशीर्वादाने फोफावली,तेच लोक चौकशीला असल्यावर त्यातून सत्य बाहेर येणार कसे, त्यामुळे मोठ्याप्रमाणावर तक्रारी झाल्यानंतर देखील काही अपवादात्मक कारवाया सोडल्या तर यात फार काही झाले नाही.मात्र या योजनेचा भ्रष्ट चेहरा आता दुष्काळानेच उघड पाडला आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये जलजीवन अभियानातून योजना मंजूर झाल्या.यापूर्वीच्या जलस्वराज्य,भारतनिर्माण, स्वजलधारा आशीष योजनांची कामे तर झाली होतीच,ज्या ठिकाणी ही कामे झाली होती,तेथेही जलजीवनमधून नव्याने कामे हाती घेण्यात आली.या सर्व कामांवर हजार कोटीपेक्षा अधिकच खर्च झालेला आहे.मात्र आज त्याच बीड जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात साडेचारशे टँकर लागत आहेत,येत्या काही महिन्यात हा आकडा दुप्पट देखील होईल असे चित्र आहे.ज्या गावांमध्ये जलजीवनचे काम पूर्ण झाले आहे, तेथे देखील पाण्यासाठी पायपीट करावी लागत असेल आणि टँकरनेच पाणी पुरवावे लागत असेल तर जलजीवनसारख्या योजनेतून नेमके कोणाचे भले झाले?
चौकशी करायची कोणी ?
बीड जिल्ह्यात मोजक्याच आणि मूठभर कंत्राटदारांकडे या योजना होत्या,त्यांना पुढाऱ्यांचे पाठबळ,काही ठिकाणी पुढाऱ्यांचीच भागीदारी,मग योजनेची तक्रार झाली तरी चौकशी करणार कोण ? गावातील पुढारीच भागीदार असेल तर विरोध तरी कोणी करायचा? पण आता त्या सर्वांच्या झळा या दुष्काळात गावाला बसू लागल्या आहेत. जलजीवनच्या पाण्यावर लोणी काढत अनेकांचे 'रिसॉर्ट ' उभे राहिले,अनेकांकडे पैशांच्या 'हिल' (टेकड्या ) तयार झाल्या,यात अनेकजण गब्बर झाले,मात्र सामांन्यांच्या तोंडचे पाणी पळाले त्याचे काय ?
आता उद्भवच कोरडे पडल्याची ढाल
जलजीवन योजना राबविलेल्या गावांमध्ये देखील सध्या पाणी टंचाई जाणवत आहे. त्याला उद्भव कोरडे पडल्याचे कारण दाखविले जात आहे.मात्र या योजनेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच उद्भव निवडण्यात झालेली पाकीटमारी अनेकांनी समोर आणली होती,फिजिबिलिटी प्रमाणपत्र देखील कसे तयार केले जाते हे देखील त्यावेळी माध्यमांनी मांडले होते. 'प्रजापत्र' ने तीन वर्षांपूर्वीच हा बोगसपणा समोर आणला होता.मात्र त्यावेळी या बोगसगिरीवर पांघरून घालण्यातच यंत्रणेने धन्यता मनाली, आता एक पावसाळा पाऊस आला नाही तर उद्भव फेल जाणार असेल तर ही योजना २- ते ४० वर्षाची तहान भागविणारी कशी ?
आज आंदोलन
जलजीवनवर अब्जावधी रुपये खर्च होऊनही आज जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर टँकर पुरवावे लागत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी 'मटका फोडी आंदोलना' ची हाक दिली आहे.बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी साडे अकरा वाजता हे आंदोलन होणार आहे.

