Advertisement

मुंबईत टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञातांकडून गोळीबार

प्रजापत्र | Sunday, 18/10/2026
बातमी शेअर करा

मुंबई : जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात टायगरचा ड्रायव्हर आणि एका रिक्षाचालकासह तिघे जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत टायगर श्रॉफ पूर्णपणे सुरक्षित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ जुहू परिसरातील 'पुष्पा पार्क'जवळून जात असताना एका मोटारसायकलवरून तिघे जण तिथे पोहोचले. कोणताही पूर्वइशारा न देता हल्लेखोरांनी थेट टायगरच्या वाहनाच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या गोळीबारात टायगरचा ड्रायव्हर आणि नजीक उभा असलेला रिक्षाचालक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक कथित व्हिडिओही समोर आला आहे.

 

हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात; आरोपींचा शोध सुरू

हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या वाहनाचा क्रमांक शोधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे. पोलीस प्रत्यक्षदर्शींकडून अधिक माहिती घेत असून अज्ञात हल्लेखोरांचा कसून शोध सुरू आहे.

Advertisement

Advertisement