धाराशिव: जिल्ह्यात सद्यस्थितीत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि दुष्काळाची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील जलसंधारण, पाणीटंचाई निवारण, चारा पुरवठा आणि समुपदेशन अशा विविध कामांसाठी सेवाभावी संस्था व नागरिकांनी पुढे येण्याचे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
संबंधित सेवाभावी संस्था व व्यक्ती नेमक्या कोणत्या स्वरूपाची मदत किंवा सेवा देणार आहेत, याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवार दि. ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात विविध जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर राबवण्याचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने नदी-नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, तलाव खोलीकरण, जुने सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि पाझर तलावांची गळती थांबवून त्यांची दुरुस्ती करणे या कामांचा समावेश आहे. याशिवाय बोअरवेल पुनर्भरण, विहीर पुनर्भरण, छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रूफ वॉटर हार्वेस्टिंग) आणि प्रत्येक शेतामध्ये 'जलतारा' तयार करणे यांसारखी महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार आहेत.
केवळ जलसंधारणच नव्हे, तर दुष्काळ काळात मनुष्य व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे यांसारख्या सेवा पुरवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत असतात. तसेच, दुष्काळी परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली असणाऱ्या बाधित घटकांसाठी समुपदेशनाची मोठी गरज असते. यासाठी समुपदेशक पुरविणाऱ्या संस्था आणि महाविद्यालयांचा सहभागही प्रशासनाकडून अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून दुष्काळ निवारणाच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

