बीड: शहरातील अवैध जुगार आणि मटका व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) धानोरा रोडवरील टी-पॉईंट परिसरात मटका जुगाराविरुद्ध दोन स्वतंत्र कारवाया करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोटारसायकलसह एकूण १ लाख ५४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी धानोरा रोड, टी-पॉईंट येथे या कारवाया करण्यात आल्या. सायंकाळी पावणेसहा वाजेच्या (१७:४५) सुमारास पहिली कारवाई करण्यात आली. यामध्ये मटका जुगार चालवणारा आरोपी रफीक बेग चाँद बेग याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २,१३० रुपये रोख रक्कम, चिठ्ठी बुक, कार्बनचा तुकडा व काळ्या रंगाचा बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर काही वेळातच, म्हणजे सव्वासात वाजेच्या (१९:१५) सुमारास पोलिसांनी त्याच परिसरात दुसरी कारवाई केली. यामध्ये आरोपी सुलतान खान सदाद पठाण याला मटका जुगार खेळवताना पकडण्यात आले. त्याच्याकडून १,९०० रुपये रोख, चिठ्ठी बुक, कार्बन व पेन यासह १ लाख ५० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. MH 23 BE 9582) असा एकूण १ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये मिळून पोलिसांनी एकूण १,५४,०३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही हद्दीत अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव काटकर, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे, हवालदार रवींद्र गोवर्धन आघाव, पोलीस शिपाई सुरज राजेंद्र वाघमारे आणि राजाभाऊ जाधव यांनी केली.

