आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानेही आपली पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सोडवत भाजपने पुणे आणि नागपूर पदवीधर, तसेच पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आपापले शिलेदार मैदानात उतरवले आहेत. विशेष म्हणजे, महायुतीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपने स्वत:कडे राखण्यात यश मिळवले आहे.
भाजपचे तीन प्रमुख उमेदवार खालीलप्रमाणे
पुणे पदवीधर मतदारसंघ : डॉ. स्मिता योगेश जाधव
नागपूर पदवीधर मतदारसंघ : सुधाकर कोहळे
पुणे शिक्षक मतदारसंघ : कौस्तुभ गावडे
नागपूर पदवीधर: सुधाकर कोहळे विरुद्ध अभिजित वंजारी
भाजपने नागपूरमध्ये जुने आणि निष्ठावान नेते सुधाकर कोहळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'रामगिरी' या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता त्यांची थेट लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्याशी होईल.
कोहळे यांची राजकीय पार्श्वभूमी : नागपूर महापालिकेत दोन वेळा नगरसेवक आणि पाणीपुरवठा सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. २०१९ मधील तिकीट कपात आणि २०२४ च्या निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.
पुणे पदवीधर: डॉ. स्मिता जाधव यांच्या रूपात नवा चेहरा
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव या सुशिक्षित चेहऱ्याला संधी दिली आहे.
डॉ. जाधव यांची ओळख : बी.ई. (कॉम्प्युटर), एम.बी.ए. (फायनान्स) आणि पीएच.डी. (एज्युकेशन) असे त्यांचे उच्च शिक्षण झाले आहे. सध्या त्या पिंपरी-चिंचवडच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, 'टोमॅटो ९४.३ एफएम'च्या कार्यकारी संचालक आणि 'पुढारी पब्लिकेशन'च्या संचालक मंडळात त्यांचा सहभाग आहे. 'कस्तुरी क्लब'च्या माध्यमातून त्यांनी १८ हजारांहून अधिक महिलांचे जाळे विणून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 'वेणुताई चव्हाण युवती पुरस्कार', 'एज्युप्रन्योर ऑफ द इयर' आणि 'ग्लोबल वुमेन इन्स्पिरेशन' यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ : कौस्तुभ गावडे निवडणुकीच्या रिंगणात
चर्चेत राहिलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी बहाल केली आहे.
गावडे यांचा परिचय : एम.कॉम आणि एम.बी.ए. पदवीधर असलेले गावडे हे कोल्हापूरच्या प्रसिद्ध 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे'त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर आहेत. शैक्षणिक संस्थांचे कामकाज, तसेच शिक्षक आणि प्राध्यापकांच्या समस्यांची त्यांना सखोल जाण आहे.
निवडणूक कार्यक्रम व वेळापत्रक
निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार राज्यातील ५ मतदारसंघांची (३ पदवीधर, २ शिक्षक) निवडणूक खालीलप्रमाणे पार पडेल:
अधिसूचना : २९ सप्टेंबर २०२६
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : ६ ऑक्टोबर २०२६
अर्जांची छाननी : ७ ऑक्टोबर २०२६
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ९ ऑक्टोबर २०२६
मतदान : २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४)
मतमोजणी व निकाल : २७ ऑक्टोबर २०२६
या सदस्यांची मुदत संपत असल्याने होणार निवडणुका
पुणे पदवीधर : अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
औरंगाबाद पदवीधर : सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
नागपूर पदवीधर : अभिजित गोविंदराव वंजारी (काँग्रेस)
पुणे शिक्षक : जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)
अमरावती शिक्षक : किरण रामराव सरनाईक (शिवसेना – एकनाथ शिंदे गट)

