बीड दि. २४ (प्रतिनिधी ) : बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शप ) पक्षातील अंतर्गत नाराजी आता आणखीच गडद होऊ लागली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय दुराव्याची चर्चा आतापर्यंत दबक्या आवाजात होती, मात्र गुरुवारी आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या पक्षाच्या मोर्चाकडे सपशेल पाठ फिरवून राजेंद्र मस्के यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. त्यामुळे आता त्यांची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
बीडच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप ) पक्षात अंतर्गत अस्वस्थता वाढली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र मस्के आणि बीडचे आ, संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय दुरावा वाढत असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी (शप ) मध्ये आलेल्या राजेंद्र मस्के यांनी विधानसभेत आ. संदीप क्षीरसागर यांना मदत केली होती, मात्र आता आ. संदीप क्षीरसागर आपल्याला विश्वासात घेत नाहीत असा राजेंद्र मस्के यांचा दावा आहे. विशेष म्हणजे ही सारी परिस्थिती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना देखील सांगितल्याचे समजते.
मागच्या काही काळात आ. संदीप क्षीरसागर आणि राजेंद्र मस्के पक्षाच्या कार्यक्रमांना देखील फारसे एकत्र दिसत नवहते, आता गुरुवारी आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वातील मोर्चाला देखील राजेंद्र मस्के उपस्थित नव्हते. या मोर्चाच्या आयोजनात आपल्याला फारसे विचारात घेतले गेले नसल्याचा त्यांचा दावा आहे. या मोर्चाकडे पाठ फिरवून त्यांनी आपला आक्रोशच जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या राजकीय दुराव्यावर आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडून कोणतेही भाष्य झालेले नाही त्यामुळे आता राजेंद्र मस्के यांची पुढची भूमिका काय असेल आणि ते कशी 'घडी ' बसविणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

प्रजापत्र | Friday, 25/09/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
