मुंबई: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पदवीधरसाठी औरंगाबाद, पुणे आणि नागपूर तर, शिक्षक मतदार संघासाठी अमरावती आणि पुणे विभागासाठी निवडणूक जाहीर करण्यात आलीय. यासाठी २३ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी मतदार होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
या मतदारसंघांसाठी निवडणूक
मराष्ट्रातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच आमदारांचा कार्यकाळ येत्या ०६ डिसेंबर २०२६ रोजी समाप्त होत आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या पदवीधर तसेच, अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना जाहीर केली जाणार असून, ०६ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असणार आहे. ०७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि ०९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटीची तारीख असेल. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होईल आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोण आहेत सध्याचे आमदार?
१) पदवीधर मतदारसंघ
– औरंगाबाद विभाग – भानुदासराव सतिश चव्हाण
– पुणे विभाग – अरुण गणपती लाड
– नागपूर विभाग – अभिजीत गोविंदराव वंजारी
२) शिक्षक मतदारसंघ
– अमरावती विभाग – किरण रामराव सरनाईक
– पुणे विभाग – जयंत दिनकर आसगावकर

