Advertisement

महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात 

प्रजापत्र | Monday, 21/09/2026
बातमी शेअर करा

 मुंबई: नैर्ऋत्य मान्सूनचा राजस्थानच्या पश्चिमेकडून परतीचा प्रवास अखेर सुरू झाला आहे. दरवर्षी साधारणपणे १७ सप्टेंबरपासून मान्सूनची माघार सुरू होते,मात्र यंदा दोन दिवस उशिराने हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यानच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत पावसासाठी पुन्हा एकदा अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. 
   बंगालच्या उपसागरात 'कमी दाबाचे क्षेत्र' आणि 'तीव्र अवदाब' भारतीय हवामान विभागाच्या सॅटेलाईट प्रणालीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र   तयार झाले आहे. २१ सप्टेंबर रोजी या प्रणालीचे रूपांतर 'अवदाबात' आणि २२ सप्टेंबरपर्यंत 'तीव्र अवदाबात' होण्याचा अंदाज आहे. २३ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ही प्रणाली दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या हवामान बदलाचा थेट प्रभाव महाराष्ट्रातील हवामानावरही दिसून येत असून राज्यातील पाऊस पुन्हा ॲक्टिव्ह झाला आहे.

 

२१ सप्टेंबरचा अंदाज: २१ सप्टेंबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

'येलो अलर्ट' असणारे जिल्हे: गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिक (घाटाचा भाग), अहिल्यानगर, पुणे (घाटाचा भाग), सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर.

इतर जिल्हे: ठाणे, रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

२२ सप्टेंबरचा अंदाज: २२ सप्टेंबरला पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे.

'येलो अलर्ट' असणारे जिल्हे: विदर्भातील सर्व जिल्हे (गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, यवतमाळ), तसेच नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर (घाटाचा परिसर) आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

इतर जिल्हे: नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये ढगाळ वातावरण राहून अतिशय तुरळक सरी पडू शकतात.

२३ सप्टेंबरचा अंदाज: २३ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरेल; मात्र दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहील, तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान मुख्यत्वे कोरडे किंवा ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

Advertisement

Advertisement