बीड दि.२०(प्रतिनिधी): बीड नगरपालिकेच्या इतिहासात सत्ताधाऱ्यांना स्वकीयांच्याच विरोधाला सामोरे जाण्याची वेळ पहिल्यांदाच निर्माण झाली असली आणि सत्ताधाऱ्यांमधीलच गटबाजी, हमरी तुमरी, खडाजंगी सध्या चर्चेचा विषय असली तरी प्रत्यक्ष सभागृहात आणि कामकाजात राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या विशेष सभेत अध्यक्षा आणि उपाध्यक्ष यांच्यातील खडाजंगीने वातावरण तापले मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविण्याचा अध्यक्षांच्या निर्णयात बंडखोर गटाला बदल करता आले नाहीत. भाजपची अध्यक्षांना पूरक असलेली भूमिका देखील बंडखोरांची कोंडी वाढविणारी आहे.
९६-९७ मधील शिवसेनेच्या सत्तेचा अपवाद वगळता दीर्घकाळानंतर यावेळी प्रथमच नगरपालिकेत क्षीरसागरांशिवायची सत्ता आली. आ. विजयसिंह पंडित यांचा पुढाकार, त्यांना अजित पवारांनी दिलेले पाठबळ यामुळे बीडकरांनी बदलाला कौल दिला, मात्र सत्ताधारी राष्ट्रवादीमध्येच थेट दोन गट पडले आणि सत्ताधाऱ्यांना स्वपक्षीय बंडखोरांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या शहराला पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांच्या दोन गटामधील कलगीतुरा, सभागृहातील हमरी तुमरी आणि सोशलमिडियातील टीकाटिपण्णी सध्या चर्चेत असली तरी यातून बंडखोर गटाला काय मिळणार हे मात्र स्पष्ट नाही.
नगरपालिकेच्या सभागृहात महत्वाच्या किंवा कळीच्या मानल्या जाणाऱ्या पदांमध्ये सत्ताधारी आघाडीत अध्यक्ष ,स्वच्छता आणि बांधकाम सभापती एका बाजूला तर उपाध्यक्ष, त्यांच्याकडेच पाणीपुरवठा हा विषय असल्याने ती समिती आणि राष्ट्रवादीचे गटनेते दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. यात पाणीपुरवठा विभागाच्या कामांच्या बाबतीत सभागृहाने घेतलेल्या ठरावावर जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतल्याने या ठरावाची अंमलबजावणी थांबलेली आहे आणि येथेच बंडखोर गटाची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे बंडखोर गटातील सदस्य नगराध्यक्षांना आक्रमक विरोध करत असताना भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी मात्र 'जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागवायला हरकत काय ?' असे म्हणत नगराध्यक्षांना पूरक भूमिका घेतली. त्यामुळे साहजिकच सभागृहात नगराध्यक्षांचे बळ वाढलेले दिसले.
राष्ट्रवादीमधील बंडखोर गटातील जे सदस्य आहेत त्यांचे भाजप आणि राष्ट्रवादी (शप) चे नेते असलेल्या दोन्ही क्षीरसागर बंधूंशी राजकीय वाद झालेले आहेत. या दोन्ही बंधूंवर टीका करूनच बंडखोर गटातील अनेकांनी निवडणूक लढविली, त्यामुळे आगामी काळातही या बंडखोर गटाला भाजप किंवा राष्ट्रवादी (शप) गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता तशी धूसर आहे. नगरपालिकेत अध्यक्षांना आणखी सव्वा वर्ष तरी संवैधानिक संरक्षण आहे, त्यामुळे लगेच सत्ताबदल कोणी करायचा म्हटलं तरी होणार नाही हे माहित असल्याने दोन्ही क्षीरसागरांची भूमिका सत्ताधाऱ्यांमधील वादाची मजा पाहण्याची आहे. आणि त्यामुळेच बंडखोर गटाला सभागृहात अपेक्षित पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे सध्या तरी खडाजंगी पलीकडे बंडखोर गटाला पालिकेत काही करता येण्यासारखी परिस्थिती नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे.
विकासाला मात्र खीळ
सत्ताधारी गटातील बेबनावाचा फटका सध्या शहराला मोठ्याप्रमाणावर बसत आहे. शहराच्या विकासासाठी निधी आहे, वित्त आयोगाचा निधी आहे, मात्र कामे कोणी करायची? कशी करायची यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने शहराची अवस्था दिवसेंदिवस बकाल होत आहे. साध्या घंटागाडीच्या निविदा निघू शकत नाहीत असे चित्र आहे. अनेक ठिकाणी भूमिपूजन केलेली कामे रखडली आहेत.विरोधकांच्या तर सोडा सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात देखील समस्या वाढलेल्या आहेत, याची राजकीय किंमत कोणाला चुकवावी लागेल हे रहस्य मात्र काळाच्या उदरात दडलेले आहे.

