Advertisement

आमदारांना अपात्र ठरवण्याचा सुप्रीम कोर्टाला अधिकार

प्रजापत्र | Thursday, 20/08/2026
बातमी शेअर करा

मुबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज उद्धव ठाकरेंच्यावतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत  यांनी युक्तिवादाला सुरुवात केली असून, आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला असलेल्या अधिकारांबाबत युक्तिवादारदम्यान मोठं भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि उद्धवसेनेच्या वकिलांकडून युक्तिवादाच्या अखेरच्या टप्प्यात केलेल्या या युक्तिवादामुळे आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

   उद्धव ठाकरे आणि उद्धवसेनेच्यावतीने युक्तिवादाला उभे राहिल्यावर ज्येष्ठ वकील कामत यांनी सुरुवातीला सुभाष देसाई प्रकरणातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा हवाला दिला. तसेच आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला अधिकार असल्याचे नमूद केले. तसेच या संदर्भातील काही उदाहरणेही खंडपीठासमोर मांडली. त्यानंतर खंडपीठानेही आमदारांना अपात्रतेसंदर्भात आम्हाला अधिकार आहेत, यात शंका नाही, हे मान्य केले.आजच्या सुनावणीवेळी देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण व्यवस्थितपणे हाताळलं नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावला आहे, असेही कामत  यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या  धनुष्यबाण ह्या चिन्हाबाबत युक्तिवाद करताना देवदत्त कामत यांनी एखाद्या पक्षातील पाच पैकी ३ आमदार फुटले तर त्यांना पक्ष देणार का? असा प्रश्न विचारला. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय देण्याआधीच निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिलं, आसा आरोप कामत यांनी केला. तसेच जर धनुष्यबाण हे चिन्ह दोघांपैकी कुणालाही द्यायचं नसेल तर  हे चिन्ह गोठवा अशी मागणी केले.  

 

Advertisement

Advertisement