बीड दि.१९(प्रतिनिधी):शहरात गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या आणि खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू असलेल्या तुकाराम गंगाधर करांडे (वय २८), रा. खडकी देवळा, ता. वडवणी, जि. बीड, सध्या रा. स्वराज्यनगर, बीड) याने बुधवार (दि.१९) पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून विविध चर्चांना उधाण आले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी बीड शहरातील हॉटेल यशोदा परिसरात पिस्टल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.पथकाने कारवाई करत करांडे याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर त्याची दोन दिवसांत जामिनावर सुटका झाली होती.दरम्यान, जामिनानंतर त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वयेही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो काही काळापासून फरार असल्याचे सांगितले जात होते.याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१९) त्याने पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा
