Advertisement

डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेला कोर्टाचा दणका

प्रजापत्र | Friday, 10/07/2026
बातमी शेअर करा

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी रमेश म्हात्रे यांच्यासह रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे या तिघांनाही १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळणार आहे.

    शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग तथा सरन्यायाधीश के. एस. कातकडे यांच्या दालनात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील आनंद आढसकर यांनी तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. तर बचाव पक्षाकडून ॲड. आनंद पथकी यांनी आरोपींची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचा आदेश दिला.या प्रकरणात गुरुवारीही न्यायालयीन नाट्य रंगले होते. प्रकृती बिघडल्याने रमेश म्हात्रे यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बचाव पक्षाने केली होती. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर केल्याशिवाय कोठडीबाबत कोणताही आदेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर उपचार पूर्ण झाल्यावर शुक्रवारी त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यात आले.शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवरील कथित मारहाणीच्या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली होती.न्यायालयाच्या आदेशानंतर आता पोलिसांना आरोपींची चौकशी, घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement