नांदेड : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेकांवर कारवाई करत गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. त्यांच्या या तत्परतेचा अनुभव आज नांदेडकरांना मिळाला. डॉक्टर लेन भागातील एका मेडिकल चालकाने ग्राहकाला चक्क डायबिटीसच्या नियमबाह्य झालेल्या गोळ्यांची विक्री केली. नियमबाह्य गोळ्या असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ग्राहकाने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना मेल केला. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी तत्परता दाखवत नांदेडच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांनी मेडिकल चालकाला नियमबाह्य झालेल्या गोळ्या विक्री करतांना पडकलं. या कारवाईने मेडिकल चालकांचं धाबे दणाणले.
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर हे आपल्या 90 वर्षीय वडिलांसाठी डायबिटीसच्या गोळ्या घेण्यासाठी शनिवारी डॉक्टर लेन येथे पोहोचले. तोष्णीवाल मेडिकलवरून त्यांनी डायिटीस गोळ्यांचे तीन पाकिटे खरेदी केले. घरी गेल्यानंतर हनुमंत वनाळेकर यांच्या मुलीला गोळ्यांची मुदत डिसेंबर २०२५ रोजी संपल्याचं निदर्शनास आलं. ही बाब समजल्यानंतर मुलगा हनुमंत वनाळेकर यांनी थेट तुकाराम मुंडे यांना मेल केला आणि तोष्णीवाल मेडिकल कडून डायबिटीसच्या मुदतबाह्य गोळ्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार केली.
मेडिकल चालकाला रंगेहाथ पकडलं
तक्रार प्राप्त होताच मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर आज संबंधित तक्रारदाराने पुन्हा मेडिकलवर जाऊन डायबिटिसच्या गोळ्या खरेदी केल्या. मुदतबाह्य गोळ्या विक्री करत असताना अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अशोक राठोड यांनी मेडिकल चालकाला पकडलं. अन्न आणि औषध प्रशासनाकडून दोन तास चौकशी करून गोळ्या जप्त केल्या. शिवाय मेडिकल बंद ठेवण्याचे आदेश दिले.दरम्यान, तोष्णीवाल मेडिकल हे शहरातील होलसेल मेडिकल म्हणून ओळखले जाते. सर्व प्रकाराच्या गोळ्या येथे विक्री केल्या जातात. मुदतबाह्य गोळ्या आढळून आल्यानं तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

