Advertisement

संपादकीय अग्रलेख -नाव मोठे लक्षण....

प्रजापत्र | Tuesday, 19/05/2026
बातमी शेअर करा

'नीट' पेपरफुटीनंतर आता या प्रकरणातील एक एक महाभाग समोर येऊ लागले आहेत. कोणी निवृत्त प्राध्यापक, कोणी कोचिंग क्लासेसमध्ये 'नावाजलेला',तर कोणी आणखी असाच बडी असामी म्हणून ओळखला जाणारा. अर्थात नीट सारख्या परीक्षेचे पेपर फोडायचे तर ते काही येरागबाळ्याचे काम असणार नाहीच, मात्र ज्यांना समाजाने आर्थिक सुबत्ता,मान,सन्मान सारे काही दिले ते लोक समाजाप्रती इतके कृतघ्न असू शकतात आणि केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतात हे सारेच चीड आणणारे आहे आणि अशांचा कायद्यानेच तितकाच कठोर बंदोबस्त होणे आवश्यक आहे.
 
     शिक्षण क्षेत्राला आपल्या समाजात एक वेगळे स्थान होते,मात्र मागच्या काही वर्षात या क्षेत्रात असणारांनीच या क्षेत्राला काळिमा फासण्याचे काम सुरु केले आहे. एकतर आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात प्रचंड प्रयोगकरण्याची खुमखुमी आपल्या राज्यकर्त्यांना कायमच असते. एक परीक्षा तर 'नीट' घेता येत नाही, मात्र विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षेच्या चक्रव्यूहात अडकविणारी धोरणे मात्र समाजव्यवस्थेवर लादली जातात. आणि मग जितक्या जास्त परीक्षा, तितक्या या क्षेत्रातील दलालांना कमवण्याच्या संधी. त्यातूनच मग आपल्या कोचिंग क्लासेसचे 'मोठे'पण सिद्ध करण्यासाठी हे क्लासेसवाले काहीही करत असतातच, आता त्यांची मजल थेट नीट चा पेपर फोडण्यापर्यंत गेली यातच खूप काही आले.
मुळातच 'नीट' च्या परीक्षेत असणाऱ्या अनेक त्रुटी यापूर्वी समोर आल्या होत्याच, मात्र त्यातून काही शिकणे तर सोडा, अशा काही त्रुटी आहेत हेच आमची नॅशनल टेस्टिंग एजेन्सी मानायला तयार नव्हती. नाहीतर एका राज्यातील विध्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यातील 'विशिष्ट' केंद्रच मागण्याची हुक्की येते आणि ती इच्छा पुरविली जाते, यामागे कोणते लॉजिक आहे. असे अनेक विषय एनटीए च्या पातळीवरचे आहेतच, मात्र त्याची कधी सरकारने फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही आणि मग त्यातूनच या परीक्षा देखील स्वतःला हव्या तशा मॅनेज करण्याची साखळी निर्माण झाली.
महाराष्ट्रात कोचिंग क्लासेसच्या क्षेत्रात मोठे नाव असलेल्या शिवराज मोटेगावकरला नीटचा पेपर फोडण्याच्या प्रकरणात अटक व्हावी हा कोचिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का आहेच, पण सीबीआयचे देखील मोठेच धाडस आहे. कारण मोटेगावकर या नावाभोवती यापूर्वी देखील अनेक गूढ घटनांचे वलय असल्याचे राज्याने, किमान लातूरकरांनी अनुभवले आहेच. यांचे क्लासेस म्हणजे हमखास वैद्यकीय आणि इतर क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ घडविण्याची फॅक्टरीच असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते, त्यामुळे मग अशा मोठ्या व्यक्तीला कोणी हात लावणार असेल तर लगेच त्यांचे 'सुरक्षा कवच' जागे होते आणि व्यवस्थेवर दबाव आणला जातो हा इतिहास आहेच. त्यामुळेच मोटेगावकरपर्यंत सीबीआय पोहचली हेच फार मोठे काम.
मोटेगावकर काय किंवा कुलकर्णी किंवा आणखी कोणी काय? यांना समाजाने खूप काही दिले. कोणी निवृत्त प्राध्यापक, कोणी एनटीए ने ठरवलेला तज्ज्ञ , कोणी क्लासेसवाला, म्हणजे या लोकांना पोट भरण्यासाठी चोरी करण्याची वेळ यावी अशी परिक्षिती तर नक्कीच नाही. गलेलठ्ठ पगारी, निवृत्ती वेतन, क्लासेसमधून मिळणारे गडगंज म्हणावे असे उत्पन्न, इतके सारे असतानाही पेपर फोडून, पेपर विकून पैसे कमवावे असे वाटावे ही विकृतीच. या विकृतीला आता समाजानेच संवैधानिक मार्गाने ठेचले पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खाजगी क्लासेसच्या संदर्भाने देखील असे 'हमखास यशाची खात्री' देण्यामागचे गौडबंगाल काय आहे याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहेच. केवळ जे सापडले त्यांचीच नव्हे तर या क्षेत्रात जे कोणी अशी गॅरंटी घेतात, त्या गॅरंटीमागची शक्तिस्थाने देखील समाजासमोर आली पाहिजेत. जे सापडले त्यांचे धागेदोरे कोणाकोणाशी होते, आपल्याकडे पैसे आहे म्हणून लाखो रुपये खर्चून आपल्या पाल्यांसाठी परीक्षे अगोदरच पेपर विकत घेणारे महाभाग कोण कोण आहेत याचाही शोध लागला पाहिजे. नाहीतरी मागच्या काही वर्षात विशिष्ट व्यावसायिकांची  लेकरं नीट सारख्या परीक्षेत आकाशाला गवसणी घालण्यासारखं यश कसं मिळवितात याच आकर्षण समाजाला आहेच, त्यामुळे या यशामागे कोणाची कशी मेहनत होती हे देखील समोर यायला हवे. मोटेगावकर काय किंवा कुलकर्णी , हे हिमनगाचे केवळ टोक आहेत, यांची पाळेमुळे आणि विस्तार समाजासमोर आला पाहिजे .

Advertisement

Advertisement