गेवराई दि.१३(प्रतिनिधी): तालुक्यातील गौंडगाव शिवारात जमिनीच्या किरकोळ वादातून एका ५७ वर्षीय शेतकऱ्याची काठ्या आणि दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्जुन साहेबराव माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या प्रकरणी गेवराई पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही थरारक घटना शनिवार (दि.११) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे रामनगर तांडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत अर्जुन माळी यांनी गौंडगाव शिवारातील शेत गट क्रमांक १५५ मधील गायरान जमिनीचा काही हिस्सा मशागतीसाठी ताब्यात घेतला होता. या जमिनीच्या उत्तर दिशेला आरोपी मधुकर नायबा शिंदे यांची मालकीची शेतजमीन आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास अर्जुन माळी हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्याच वेळी आरोपी मनोहर शिंदे याने मृताचा मुलगा पपेश याला “तुझा बाप जास्त मस्तीला आला आहे, त्याला जाऊन बघतो” अशी उघड धमकी दिली होती. संशय आल्याने पपेश आणि त्याचा मित्र गणेश महाजन यांनी तातडीने शेताकडे धाव घेतली.घटनेच्या ठिकाणी आरोपी मधुकर नायबा शिंदे, त्याचा मुलगा मनोहर मधुकर शिंदे आणि नातू अजय मनोहर शिंदे यांनी संगणमत करून अर्जुन माळी यांना घेरले होते. शेताचा बांध का फोडला या कारणावरून वाद घालत आरोपींनी माळी यांना काठ्या व दगडांनी अमानुष मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत अर्जुन माळी यांना प्रथम गेवराई येथील सरकारी दवाखान्यात आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पपेश माळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

