Advertisement

येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवस्थानात कोट्यवधींची चोरी

प्रजापत्र | Friday, 27/03/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी): कळंब तालुक्यातील येरमाळा येथील प्रसिद्ध श्री येडेश्वरी देवस्थान मंदिर ट्रस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व चोरी झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी मंदिराचे माजी सभासद व पुजारी दत्ता पांडूरंग मोकाशे आणि वंशपरंपरागत पुजारी मधुकर लिंबराज आगलावे यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय धाराशिव येथे लेखी तक्रार दाखल केली आहे.

     तक्रारीनुसार,मंदिरातील दानपेटी व दागिन्यांच्या पेटीत ठेवलेले सोने, चांदी व रोख रक्कम काही पुजारी आणि ट्रस्टी यांनी संगनमत करून बेकायदेशीररीत्या हडप केल्याचा आरोप आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंद असलेल्या सुमारे ४२ तोळे सोने व १२ किलो चांदी व्यतिरिक्त, २०१८  पासून आजपर्यंत भाविकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत अंदाजे ३० लाख रुपयांची गुप्तदान रक्कम तसेच ८० ते ९० लाख रुपयांच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचा उल्लेख आहे. एकूणच या गैरप्रकाराची रक्कम सुमारे ३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. या प्रकरणाबाबत ट्रस्टींकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असून, पुढील चौकशी केल्यास समाजातून बहिष्कार टाकण्याची व उपजीविकेवर परिणाम होईल अशा धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांवर मानसिक ताण निर्माण झाला असून, जीवितास धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.श्री येडेश्वरी देवस्थान हे राज्यासह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, दरवर्षी यात्रेदरम्यान लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलीस ठाण्याला प्रत पाठविण्यात आली आहे.दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भाविकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. आता प्रशासन या प्रकरणाची काय दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement