मुंबई दि.१० (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (दि.१०) रोजी मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याने आजचा दिवस राज्याच्या राजकारणात अत्यंत ऐतिहासिक आणि भावूक ठरला.
सुनेत्रा अजित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून भावनांना वाट मोकळी करून दिली. आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा.अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

