मुंबई :राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर दिला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जमीनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्र्यांनी हा मोठा निर्णय (Maharashtra Floods Decision) घेतलाय. पूरग्रस्त जमीनीसाठी गौण खनिजे इत्यांदींवर रॉयल्टी माफ करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अतिवृष्टी बाधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांना आपण जगाचा पोशिंदा, अन्नदाता म्हणतो. पण सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय. अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतकऱ्यांच्या घराचं, पिकांचं आणि त्याचबरोबर जमिनींचं मोठं नुकसान झालंय. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला सप्टेंबर महिन्यात महापूर आला होता. या पुरात शेतकऱ्यांची पिकं तर वाहून गेलीच, पण जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. जमिनीला 10 ते 15 फुटाचे खड्डे पडलेत. नदीने पाण्याचा प्रवाहच बदलल्यानं सगळं होत्याचं नव्हतं झालं आहे. अशीच काहीशी परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बघायला मिळाली आहे. दरम्यान, या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मायेचा आधार देण्यासाठी आता राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात पावसाचे थैमान चालू असून, पुर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील 1,785,714 हेक्टर (4,284,846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.
सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे नांदेड (728,049 हेक्टर), यवतमाळ (318,860 हेक्टर), वाशीम (203,098 हेक्टर), धाराशिव (157,610 हेक्टर), अकोला (177,466 हेक्टर), सोलापूर (47,266 हेक्टर) आणि बुलढाणा (89,782 हेक्टर) आहेत.राज्यातील एकूण 195 तालुक्यांमध्ये या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून 654 महसूल मंडळांतील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

