धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी):अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे उद्ध्वस्त, संसार पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. या कठीण प्रसंगी पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला शिवसेना आणि युवासेना धावून आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मुंबईहून स्वतः मदतीचे ट्रक घेऊन धाराशिवला दाखल झाले असून आज पूरग्रस्त नागरिकांना या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
या मदत साहित्यामध्ये साडी,सतरंजी, ब्लॅंकेट यांसह दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तूंचाही समावेश आहे. पूरामुळे घरगुती वस्तू, कपडे व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले असल्याने या वस्तूंमुळे नागरिकांना तातडीचा दिलासा मिळणार आहे.
पूरग्रस्तांच्या हातात जीवनावश्यक वस्तू व गृहपयोगी साहित्य पोहोचल्याने त्यांच्या डोळ्यांत दिलासा व कृतज्ञतेचे भाव उमटेल. स्थानिक नागरिकांनी या मदत उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून “संकटाच्या काळात सरकारसोबतच समाजातील संस्था आणि संघटनाही पुढे येत असल्याने हुरूप मिळत आहे” अशी भावना व्यक्त केली.
प्रशासनाच्या समन्वयाने मदत कार्य सुरू असून येत्या काही दिवसांत आणखी मदत सामग्री विविध गावांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.